नाशिक शहरात रस्त्यांच्या कामांवर कोट्यवधी रुपये खर्च होत असतानाच पुन्हा रस्ते खोदण्याची शक्यता निर्माण झाली आहे. MNGLच्या गॅस पाइपलाइनसाठी सुरू असलेल्या खोदाई आणि क्रॉस कनेक्शनच्या नियोजनावरून महापालिकेच्या महासभेत जोरदार चर्चा झाली. रस्ते तयार झाल्यानंतर पुन्हा खोदाई करावी लागणार का, असा थेट सवाल नगरसेवकांनी उपस्थित केला.
शहरातील MNGLच्या खोदाईमुळे अपघातांचा धोका वाढत असल्याच्या तक्रारीनंतर कंपनीचे अधिकारी संदीप श्रीवास्तव यांना महासभेत बोलावण्यात आले. यावेळी सदस्य गुरुमित बग्गा यांनी गॅस पाइपलाइनच्या क्रॉस कनेक्शनच्या नियोजनाबाबत प्रश्न उपस्थित केले.
गॅस वितरणासाठी सुमारे ३० मीटर अंतरावर क्रॉस कनेक्शनची आवश्यकता असल्याचे MNGLकडून स्पष्ट करण्यात आले. तसेच काही चौकांमध्येही क्रॉस कनेक्शन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे सध्या तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांवर भविष्यात घराघरात गॅस जोडणी देण्यासाठी पुन्हा खोदाई करावी लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनीही MNGLच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. आपल्या निवासस्थानासमोर दोन वर्षांपूर्वी गॅस पाइपलाइन टाकण्यात आली, मात्र अद्याप गॅस कनेक्शन मिळाले नसल्याचे त्यांनी सभेत सांगितले. महापालिकेने परवानगी देऊनही अपेक्षित काम पूर्ण होत नसल्याने प्रशासनासमोर अडचणी निर्माण होत असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
महासभेत MNGLच्या खोदाईबाबत देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, सुमारे ७४० किलोमीटर खोदाईला परवानगी देण्यात आली असून त्यापैकी ६४० किलोमीटर खोदाई पूर्ण झाली आहे. आणखी १०० किलोमीटर खोदाईचे काम बाकी असल्याची माहिती समोर आली. आतापर्यंत सुमारे ४६ हजार गॅस कनेक्शन सुरू झाल्याचेही सांगण्यात आले.
रस्त्यांची कामे सुरू करण्यापूर्वीच पाइपलाइन आणि क्रॉस कनेक्शनचे योग्य नियोजन करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. अन्यथा नव्याने तयार होणाऱ्या रस्त्यांवर पुन्हा खोदाईचे संकट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे MNGLच्या आगामी कामांना परवानगी देताना महापालिका प्रशासन कोणती भूमिका घेणार, याकडे आता लक्ष लागले आहे.


