नाशिकमधील ठक्कर बाजार परिसरात बस स्थानकांचे स्थलांतर आणि गेल्या दोन महिन्यांपासून रखडलेल्या रस्त्याच्या कामाचा थेट फटका स्थानिक व्यापाऱ्यांना बसत आहे. ग्राहकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात घटल्याने अनेक व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला असून आर्थिक नुकसान सहन करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
सीबीएस ते त्र्यंबक रोडदरम्यान सुरू असलेल्या खोदकामामुळे या परिसरातील वाहतुकीची मोठी गैरसोय होत आहे. रस्त्यावर सुरू असलेल्या कामामुळे वाहनांची कोंडी, धूळ आणि अडथळ्यांमुळे ग्राहक बाजारात येण्याचे प्रमाण कमी झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
व्यापाऱ्यांसह स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने रस्त्याचे काम प्राधान्याने पूर्ण करून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी केली आहे. रखडलेल्या कामामुळे व्यापार आणि दैनंदिन वाहतुकीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


