नाशिक : शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकासकामांसाठी सुरू असलेल्या खोदकामामुळे नागरिक तसेच वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या प्रश्नावर आता नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनने आक्रमक भूमिका घेतली असून, 20 ऑगस्टपर्यंत रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध विकासकामे सुरू आहेत. या कामांसाठी अनेक ठिकाणी रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले आहे. शहरातील तब्बल 1 हजार 230 किलोमीटर रस्ते विविध कामांमुळे प्रभावित असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यातच पावसामुळे रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतुकीच्या समस्येत आणखी भर पडली आहे.

खराब रस्त्यांमुळे मालवाहतूक आणि सार्वजनिक वाहतुकीवरही परिणाम होत असल्याचे ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे म्हणणे आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होण्यासोबतच अपघाताचा धोकाही वाढल्याचा दावा करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून नागरिक आणि वाहनचालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी असोसिएशनने केली आहे. 20 ऑगस्टपर्यंत रस्ते खड्डेमुक्त न झाल्यास तीव्र जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

सिंहस्थ विकासकामे महत्त्वाची असली तरी त्यासोबत नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतुकीची सुरळीत व्यवस्था यांनाही प्राधान्य मिळावे, अशी भूमिका ट्रान्सपोर्ट असोसिएशनने मांडली आहे. त्यामुळे आता प्रशासन या मागणीवर कोणती भूमिका घेते आणि रस्ते दुरुस्तीला किती वेग दिला जातो, याकडे लक्ष लागले आहे.