नाशिकच्या सातपूर परिसरातील श्रमिकनगर–सातमाऊली चौकाजवळ रस्त्यावरील खड्ड्यामुळे भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. खड्डा चुकवताना नियंत्रण सुटलेल्या पिकअप वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने राकेश जगताप हे गंभीर जखमी झाले.

या अपघातात राकेश जगताप यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघात घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. स्कूल व्हॅन चालक सुनील रकीबे यांनी प्रसंगावधान राखत स्थानिकांच्या मदतीने जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल केले.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सातपूर परिसरातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून पावसामुळे त्यामध्ये पाणी साचत आहे. त्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वारंवार अपघात होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून खड्डे कायमस्वरूपी बुजवावेत आणि सुरक्षित वाहतुकीसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.