सिटीलिंक कर्मचाऱ्यांच्या गेल्या काही काळापासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांना अखेर यश आल्याची माहिती समोर आली आहे.
कर्मचाऱ्यांची थकीत वेतनाची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली असून, त्यामुळे चालक-वाहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
याशिवाय कर्मचाऱ्यांना गणवेश, शूज, बेल्ट आणि जॅकेट देण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
चालक-वाहकांच्या विविध प्रश्नांवर प्रशासनासोबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली.
प्रलंबित मागण्या मार्गी लागल्यानंतर सिटीलिंक कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
या पार्श्वभूमीवर राजीव गांधी भवन येथे सुधाकर बडगुजर यांचा ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिशबाजीत जंगी सत्कार करण्यात आला.
वेतनासह इतर मागण्यांवर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याने कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
उर्वरित प्रलंबित प्रश्नही लवकरच मार्गी लागतील, असा विश्वास कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.


