नाशिकमधील पाथर्डी-दाडेगाव रस्त्यावरील वालदेवी नदीच्या पुलाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पाणी आल्याने पुलावरून पाणी वाहत असताना एक नागरिक वाहून गेल्याची घटना घडली. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले असून संबंधित व्यक्तीचा शोध सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, वालदेवी नदीवरील पुलाचा प्रश्न गेल्या 35 ते 40 वर्षांपासून प्रलंबित आहे. पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग अत्यंत धोकादायक बनतो. यापूर्वीही शेतकरी, जनावरे तसेच नागरिक पुराच्या पाण्यात वाहून गेल्याच्या घटना घडल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.
स्थानिकांनी आमदार, खासदार, महापालिका आणि लोकप्रतिनिधींकडे वारंवार कायमस्वरूपी पुलाची मागणी केल्याचे सांगितले. मात्र अद्याप प्रश्न मार्गी लागलेला नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे. सध्याच्या घटनेनंतरही संबंधित व्यक्तीचा शोध सुरू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले असून या घटनेसाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना जबाबदार धरत त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
दरम्यान, पाथर्डी-दाडेगाव मार्गावरील या पुलाचा प्रश्न आता तरी मार्गी लागणार की प्रशासन पुढील दुर्घटनेची वाट पाहणार, असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.


