सुरगाणा  तालुक्यातील नाशिक-सापुतारा मार्गावर मद्यतस्करीचा थरारक प्रकार समोर आला आहे. दारूबंदी विभागाला दमणनिर्मित अवैध मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर राऊ हॉटेल परिसरापासून संशयित ब्रिझा कारचा पाठलाग सुरू करण्यात आला.

पोलिसांचा पाठलाग सुरू असल्याचे लक्षात येताच आरोपींनी भरधाव वेगाने वाहन चालवत पसार होण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी पोलिसांच्या वाहनासह काही खासगी वाहनांनाही धडक दिली. या घटनेमुळे काही काळ महामार्गावर भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

 

अखेर सापुताऱ्याजवळ संशयितांचे वाहन अडवण्यात दारूबंदी विभागाला यश आले. पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेत वाहनाची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणावर अवैध मद्यसाठा आढळून आला. या कारवाईत सुमारे साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अवैध मद्यसाठा नेमका कुठून आणला जात होता आणि तो कुठे नेला जाणार होता, याचा पुढील तपास दारूबंदी विभागाकडून करण्यात येत आहे.