धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर पश्चिम पट्ट्यात दुष्काळाच्या संकटाचा सामना करणाऱ्या शेतकरी कुटुंबांना दिवाळीनिमित्त मदतीचा हात देण्यात आला आहे. पावसाची अनिश्चितता, पिकांचे नुकसान आणि आर्थिक अडचणींमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीने दिवाळी शिध्याचे वाटप करण्यात आले.
साक्रीच्या आमदार मंजुळा गावित, शिवसेनेचे धुळे जिल्हाप्रमुख तुळशीराम गावित आणि विधानसभा प्रमुख संभाजी अहिरराव यांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी शेतकरी कुटुंबांना दिवाळी शिध्याचे वाटप करून त्यांना सणाच्या काळात दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या उपक्रमादरम्यान शेतकऱ्यांच्या अडचणी आणि शेतीशी संबंधित प्रश्न जाणून घेण्यात आले. शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देणे, पिकांना योग्य भाव मिळवून देणे, तसेच पिकांच्या नुकसानीची भरपाई आणि शासकीय मदत तातडीने मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याची भूमिका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.
दिवाळी शिध्याच्या वाटपाबरोबरच शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांसाठीही प्रयत्न करण्याचे आश्वासन देण्यात आले. दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या शेतकरी कुटुंबांना या उपक्रमातून सणाच्या काळात काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


