राज्यात सुरू असलेल्या अन्न भेसळविरोधी विशेष मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने मोठी धडक कारवाई करत लाखो रुपयांचा संशयित अन्नसाठा जप्त केला आहे. संशयित खाद्यतेल, भेसळयुक्त तूप, प्रतिबंधित अन्नपदार्थ तसेच परवान्याविना सुरू असलेल्या व्यवसायांवर कारवाई करण्यात आली असून अनेक आस्थापनांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे.
अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा विभागाने मालेगाव, आडगाव, जुने नाशिक आणि उपनगर परिसरात विशेष तपासणी मोहीम राबवली.
या मोहिमेदरम्यान मालेगाव येथील श्रीराम एंटरप्रायझेसमधून सुमारे १७ लाख २७ हजार रुपयांचे संशयित रिफाइंड सोयाबीन तेल जप्त करण्यात आले. परवाना, विक्री बिल आणि उत्पादनाच्या गुणवत्तेबाबत गंभीर त्रुटी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली.
याचवेळी मालेगावमधील ए-वन ताज बेकरीमध्ये परवान्याविना व अस्वच्छ परिस्थितीत उत्पादन सुरू असल्याचे आढळून आले. त्यामुळे सुमारे ४०० किलो टोस्ट जप्त करण्यात आला असून संबंधित आस्थापनाला 'स्टॉप बिझनेस नोटीस' बजावण्यात आली.
आडगाव येथील स्वागतम स्वीट्समधून संशयित भेसळयुक्त ९ किलो गायीचे तूप जप्त करण्यात आले. तर जुने नाशिकमधील भारत जनरल स्टोअरमधून एक लाख एक हजार रुपयांहून अधिक किमतीचे प्रतिबंधित अन्नपदार्थ जप्त करून दुकान सील करण्यात आले. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याशिवाय उपनगर येथील सँडी बेकर्सचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरोधातील कारवाया पुढेही अधिक तीव्र करण्यात येतील, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.


