भूकंपाच्या पार्श्वभूमीवर पेठ-दिंडोरीत प्रशासन अलर्ट; NDRFकडून नागरिकांना प्रशिक्षण
नाशिक जिल्ह्यातील पेठ आणि दिंडोरी तालुक्यात भूकंपाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. संभाव्य आपत्तीच्या काळात नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी आणि बचावकार्याची पद्धत याबाबत NDRF पुणे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून विशेष प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रशिक्षणादरम्यान भूकंपासह आग, पूर आणि इतर नैसर्गिक आपत्तींच्या वेळी कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी स्थलांतर कसं करावं, तसेच बचावकार्यादरम्यान कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, याची माहिती देण्यात आली.
पेठ तालुक्यातील इनामबारी येथे NDRFच्या पथकाने बचावकार्याची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके सादर केली. आपत्तीच्या वेळी नागरिकांनी घाबरून न जाता शांतपणे आणि योग्य पद्धतीने परिस्थितीचा सामना करण्यावर यावेळी भर देण्यात आला.
आपत्कालीन परिस्थितीत प्रशासन आणि बचाव पथकांना सहकार्य करण्याचे, तसेच अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
भूकंपाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नागरिकांमध्ये जनजागृती आणि आपत्ती व्यवस्थापनाची तयारी मजबूत करण्यासाठी अशा प्रशिक्षणावर भर दिला जात आहे.
आपलं नाशिक | आपला आवाज


