गणेशोत्सवाच्या श्रद्धेला पर्यावरण संवर्धनाची जोड देत WOW – Women of Wisdom यांच्या वतीने ‘आरंभ – एक गणपती परंपरेचा’ हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत नागरिकांना धातूची गणेशमूर्ती स्वीकारून दरवर्षी जलाशयातील विसर्जन टाळण्याचा संदेश दिला जात आहे. श्रद्धा आणि पर्यावरणाची सांगड घालणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
गणेशमूर्तींचे जलाशयातील विसर्जन टाळल्यामुळे जलप्रदूषण कमी करण्यासोबतच जलचर जीवांचे संरक्षण करण्यास मदत होत आहे. तसेच विसर्जनानंतर मूर्तींची होणारी विटंबना टाळण्यासही या उपक्रमामुळे हातभार लागत आहे.
या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची विसर्जनासाठी होणारी धावपळ कमी होण्यास मदत होत असल्याचे सांगण्यात आले आहे.
आतापर्यंत तब्बल ४,४०० गणेशमूर्तींचे जलाशयातील विसर्जन टळल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
श्रद्धेसोबतच पर्यावरण संवर्धनाचे संस्कार पुढच्या पिढीत रुजावेत, हा ‘आरंभ’ उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
गणेशोत्सव अधिक पर्यावरणपूरक करण्यासाठी नागरिकांनी धातूची गणेशमूर्ती स्वीकारावी आणि दरवर्षी मूर्तीचे पुनर्वापराने पूजन करण्याची परंपरा पुढे न्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पर्यावरणाचा समतोल राखत गणेशभक्तीची परंपरा जपण्याचा प्रयत्न करणारा ‘आरंभ’ उपक्रम नागरिकांसाठी एक वेगळा पर्याय ठरत आहे.
‘आरंभ – एक गणपती परंपरेचा’ या पर्यावरणपूरक उपक्रमाची संकल्पना काय आहे आणि आतापर्यंत ४,४०० मूर्तींचे विसर्जन कसे टळले? जाणून घ्या Apla Nashik च्या या खास रिपोर्टमध्ये.


