नाशिक : नाशिक-मुंबई रेल्वे प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कसारा येथे आसनगाव-कसारा तिसऱ्या रेल्वेमार्गाच्या जोडणीसह यार्डमधील महत्त्वाची कामे हाती घेण्यात आली आहेत. यासाठी मध्य रेल्वेने ७ ते १८ ऑक्टोबरदरम्यान १२ दिवसांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे. या ब्लॉकचा १० ते १३ ऑक्टोबरदरम्यान नाशिकमार्गे धावणाऱ्या अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
या कालावधीत तपोवन, पंचवटी, सेवाग्राम, कामायनी, गीतांजली आणि पुष्पक यांसारख्या गाड्यांना विलंब होण्याची शक्यता आहे. काही गाड्या ३५ ते ४० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील, तर मुंबईहून सुटणाऱ्या काही गाड्या २५ ते ३० मिनिटे उशिराने धावतील. विशेषतः १०, १२ आणि १३ ऑक्टोबर रोजी दुपारनंतर, तसेच ११ ऑक्टोबरला सकाळपासून सायंकाळपर्यंत ब्लॉकचा परिणाम जाणवणार आहे.
या कामांमुळे कसारा-खर्डी आणि उंबरमाळी-कसारा दरम्यानची अप मेन लाइन, कसारा स्थानकातील काही प्लॅटफॉर्म आणि अप यार्ड प्रभावित राहणार आहेत. कसारा-असनगावदरम्यान उपनगरीय रेल्वेसेवाही बंद राहतील. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी गाड्यांचे सुधारित वेळापत्रक तपासून नियोजन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
दुसरीकडे कसारा ब्लॉकमुळे रेल्वे सेवा प्रभावित होत असली तरी नाशिक-आसनगावदरम्यान एसटी बससेवा सुरू ठेवण्यात आली आहे. दरम्यान, द्वारका  परिसरातील काळ्या-पिवळ्या टॅक्सी आणि खासगी ट्रॅव्हल्सच्या वाहनांना मोठी मागणी वाढली आहे. रेल्वे प्रवाशांकडून आसनगाव-नाशिक प्रवासासाठी या पर्यायी वाहतुकीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असून, ब्लॉकच्या काळात प्रवाशांची गर्दी वाढली आहे.