नाशिक : महापालिकेच्या पाणीबिल वितरण आणि मीटर रीडिंगचे काम करणाऱ्या कंपनीच्या कार्यपद्धतीवर नाशिक जिल्हा नळजोडणी संघटनेने आक्षेप घेतला आहे. नागरिकांचे पाणीमीटर खराब असल्याचे सांगून त्यांना विशिष्ट कंपनीचे महागडे मीटर खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी पाणीपुरवठा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

'कॅनबेरी अॅनालिटिक्स' कंपनीत सुमारे तीनशे ते साडेतीनशे कर्मचारी कार्यरत असून, प्रत्येक कर्मचाऱ्याला दररोज दहा नोटिसा देण्याचे उद्दिष्ट असल्याचा संघटनेचा दावा आहे. त्यामुळे दररोज तीन हजार ते साडेतीन हजार नोटिसा दिल्या जात असल्यास, प्रत्यक्षात किती मीटर नादुरुस्त आढळले आणि किती बदलण्यात आले, याची अधिकृत आकडेवारी जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश कांबळे, नवीन नाशिक शाखाध्यक्ष शिवाजीराव खोडे आणि खजिनदार तुकाराम महाजन यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून घरोघरी जाऊन मीटर नादुरुस्त असल्याचे सांगितले जात असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. नागरिकांना विशिष्ट कंपनीचेच मीटर बसवण्यास सांगण्याचा अधिकार कर्मचाऱ्यांना कोणी दिला, तसेच ठेक्यात यासंदर्भात कोणत्या अटी आहेत, याची तपासणी करण्याची मागणी संघटनेने केली आहे.

याशिवाय, याच कंपनीने यापूर्वी मुख्य व वितरण जलवाहिन्यांवर आणि पाण्याच्या टाक्यांवर प्रत्येकी चार ते पाच लाख रुपये खर्चून बसवलेल्या जलमापकांचीही चौकशी करण्याची मागणी झाली आहे. किती जलमापक कार्यरत आहेत, किती बंद आहेत आणि किती प्रत्यक्ष ठिकाणी उपलब्ध नाहीत, याची पडताळणी करून खर्चाचा हिशेब सार्वजनिक करावा, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे.