सिन्नर येथील ऐतिहासिक आणि हेमाडपंथी स्थापत्यशैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदेश्वर मंदिराच्या संवर्धनाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मंदिराच्या दुरुस्ती आणि जतनासाठी मंजूर करण्यात आलेल्या ५ कोटी रुपयांच्या निधीपैकी केवळ दीड कोटी रुपये खर्च झाल्याचा मुद्दा खासदार राजाभाऊ वाजे यांनी उपस्थित केला आहे.

दिल्ली येथे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) विभागाच्या महासंचालकांची भेट घेत खासदार वाजे यांनी गोंदेश्वर मंदिराच्या संवर्धनाबाबत सविस्तर निवेदन सादर केले. मंजूर निधीपैकी उर्वरित रक्कम पारदर्शक पद्धतीने खर्च करून संवर्धनाची प्रलंबित कामे तातडीने सुरू करण्याची मागणी त्यांनी केली.

निवेदनात मंदिराच्या मुख्य शिखरावरील तसेच नंदीमंडपावरील काही दगडी शिळा सैल झाल्याने भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे तांत्रिक पाहणी करून आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय मंदिर परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, माहितीफलक, पर्यटकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा आणि परिसराचे सुशोभीकरण करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. देश-विदेशातून गोंदेश्वर मंदिराला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टीने या सुविधा अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

इतिहास, वास्तुकला आणि धार्मिक महत्त्व लाभलेल्या गोंदेश्वर मंदिराच्या संवर्धनासाठी मंजूर झालेला संपूर्ण निधी नियोजनबद्ध पद्धतीने खर्च करून कामांना गती देण्याची अपेक्षा स्थानिक नागरिक आणि भाविकांकडूनही व्यक्त केली जात आहे.