नाशिकमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला हंगामातील दुसरा पूर आला आहे. गंगापूर धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे नदीची पाणीपातळी वाढली असून दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी पोहोचले आहे. या पार्श्वभूमीवर सराफ बाजारात पुराचे पाणी शिरण्याची भीती निर्माण झाल्याने व्यापाऱ्यांनी दुकाने रिकामी करण्यास सुरुवात केली आहे.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे गंगापूर धरण सुमारे ९० टक्के भरले असून धरणातून १२ हजार ६०० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे रामकुंड परिसरातील मंदिरे पाण्याखाली गेली असून गोदावरी नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. नांदूर मध्यमेश्वरमधूनही ५५ हजार क्युसेकपेक्षा अधिक पाणी पुढे सोडले जात आहे.
पूरस्थितीची तीव्रता लक्षात घेऊन महापालिकेने नदीकाठच्या सराफ बाजारासह लगतच्या बाजारपेठांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी सोन्या-चांदीचे व्यापारी, तांबे-पितळ भांडी विक्रेते आणि कपड्यांच्या दुकानदारांनी मौल्यवान साहित्य सुरक्षित गोडाऊनमध्ये हलवण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, शहरात काही ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटनाही घडल्या असून जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट कायम आहे. मनपा आणि आपत्कालीन यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नदीकाठच्या नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे तसेच विनाकारण पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.


