नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात सुरू असलेल्या रस्ते विकासकामांच्या गुणवत्तेवर पहिल्याच पावसाने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. गंगापूर रोडसह शहरातील अनेक नव्याने तयार करण्यात आलेले रस्ते अवघ्या काही दिवसांत खचल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून दोषी ठेकेदारांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

आनंदवली ते सोमेश्वरदरम्यानचा गंगापूर रोड काही दिवसांपूर्वीच नव्याने तयार करण्यात आला होता. मात्र, सलग झालेल्या पावसानंतर या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्याचा काही भाग खचल्याचे समोर आले आहे. यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला आहे.

खड्ड्यांमुळे अनेक वाहने अडकून पडल्याच्या घटना घडल्या असून दुचाकीस्वार आणि चारचाकी चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. नव्याने झालेल्या रस्त्यांची एवढ्या कमी कालावधीत झालेली दुरवस्था पाहता कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कुंभमेळ्याच्या तयारीच्या नावाखाली निकृष्ट दर्जाची कामे होत असल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे.

 

.https://www.aplanashik24.tv/nashik-news/kalwan-leopard-attack-ravalji-nashik

 

दरम्यान, महापालिका प्रशासनाकडून संबंधित ठेकेदारांना कामांच्या गुणवत्तेबाबत सूचना दिल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात रस्त्यांची अवस्था वेगळीच चित्र दर्शवत आहे. अधिकारी आणि ठेकेदार एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित कामांची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांना तातडीने ब्लॅकलिस्ट करावे तसेच दोषींवर कठोर कारवाई करून रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी नाशिककरांनी केली आहे.