नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक रोड रेल्वेस्थानकाचा मोठ्या प्रमाणावर कायापालट सुरू आहे. लाखो भाविक आणि प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन स्थानकावर नवीन पायाभूत सुविधा उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे.

नाशिक रोड रेल्वेस्थानकावर सध्या दोन नवीन पादचारी पुलांचे बांधकाम प्रगतीपथावर असून, कुंभमेळ्यापूर्वी स्थानकावर एकूण तीन पादचारी पूल उपलब्ध होणार आहेत.

या स्थानकावर दररोज सुमारे ४० ते ४५ हजार प्रवाशांची वर्दळ असते. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षित आणि सुलभ ये-जा सुनिश्चित करण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये मोठी वाढ करण्यात येत आहे.

उभारण्यात येणाऱ्या तीनही पादचारी पुलांना रॅम्प आणि एस्केलेटरची सुविधा असणार आहे. याशिवाय स्थानकाच्या चारही प्लॅटफॉर्मवर लिफ्टची व्यवस्था करण्यात येणार आहे.

पार्सल कार्यालयासमोरील जुन्या पुलाशेजारी उभारण्यात येणारा नवीन पूल प्लॅटफॉर्म क्रमांक १ ते सिन्नरफाटा भागातील नवीन इमारतीच्या पहिल्या मजल्यापर्यंत जोडला जाणार आहे. हा पूल पूर्ण झाल्यानंतर जुन्या पुलाचे कामकाज थांबवून तो हटवण्यात येणार आहे.

तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक १ च्या पुढील बाजूस ४० फूट रुंद आणि सुमारे ६० मीटर लांबीचा भव्य पादचारी पूल उभारण्यात येणार आहे. या पुलावर तब्बल सहा एस्केलेटर बसवण्यात येणार आहेत.

या संपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी सुमारे १५ कोटी ८८ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता या सुविधांमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

कुंभमेळ्यापूर्वी नाशिक रोड रेल्वेस्थानक अधिक आधुनिक, सुसज्ज आणि प्रवासी-अनुकूल करण्याच्या दृष्टीने सुरू असलेली ही कामे महत्त्वाची ठरणार आहेत.