विद्यार्थ्यांना अमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी आणि सायबर जगतात सुरक्षित राहण्यासाठी नाशिक रोड रेल्वे पोलिसांकडून तक्षशिला विद्यालयात जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमात पोलिसांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे दुष्परिणाम, व्यसनाधीनतेची कारणे आणि NDPS कायद्यातील तरतुदींची माहिती दिली. चुकीची संगत, मित्रांचा दबाव आणि मानसिक ताण यामुळे व्यसनाची सवय लागू शकते, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी जीवनशैली स्वीकारावी, तसेच डिजिटल युगात जबाबदार नागरिक म्हणून वावरावे, असा संदेश पोलिसांनी दिला.

सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन व्यवहार करताना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत 112 या क्रमांकावर, तर सायबर फसवणूक झाल्यास 1930 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थविरोधी जागरूकता आणि डिजिटल सुरक्षेबाबत सजगता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.