नाशिकच्या प्रसिद्ध कपालेश्वर मंदिरात श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी पारंपरिक पंचमुखी पालखी सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला. सायंकाळी कपालेश्वर मंदिरातून निघालेल्या या पालखी सोहळ्याला भाविकांनी मोठी गर्दी केली. मालवीय चौक, शनी चौक, काळाराम मंदिराचा पूर्व दरवाजा, मुठे गल्ली आणि सरदार चौक मार्गे पालखी रामकुंड परिसरात दाखल झाली.

कपालेश्वर मंदिरातील पंचमुखी पालखी सोहळ्याला 1893 पासूनची ऐतिहासिक परंपरा असल्याचे सांगितले जाते. दादा उमाशंकर वैद्य यांनी सुरू केलेली ही परंपरा आजही वैद्य परिवाराकडून भक्तिभावाने जपली जात आहे. रामकुंडावर पालखीचे विधिवत पूजन आणि अभिषेक करण्यात आला. सुमारे तीन तास धार्मिक विधी पार पडल्यानंतर शृंगार केलेला मुकुट कपालेश्वर मंदिरातील शिवलिंगावर विराजमान करण्यात आला.

यावेळी ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने गोदाकाठ दुमदुमून गेला. श्रद्धा, परंपरा आणि इतिहासाचा संगम असलेल्या या सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी नाशिकसह परिसरातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनीही सहकुटुंब रामकुंड परिसरात उपस्थित राहून कपालेश्वर महादेवाच्या मुकुट अभिषेकाचे दर्शन घेतले.

शतकाहून अधिक काळाची परंपरा जपणाऱ्या या पंचमुखी पालखी सोहळ्यामुळे श्रावण महिन्यात नाशिकच्या धार्मिक वातावरणाला विशेष रंग चढला.