राणेनगर आणि इंदिरानगर परिसरात श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. राणेनगरात गोविंदा पथकाने नऊ थरांचा मानवी मनोरा रचत दहीहंडी फोडली. हा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

राणेनगर येथील शारदा शाळेजवळील मैदानात श्री गुरुधन मित्र मंडळाच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. कांदिवलीच्या ओम साई माऊली गोविंदा पथकाने नऊ थर रचत दहीहंडी फोडली.

उत्कृष्ट कामगिरीबद्दल पथकाला ३ लाख ३३३ रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह आणि बक्षीस देऊन गौरवण्यात आले. बालकांसाठीही श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

दहीहंडी उत्सवामुळे राणेनगर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. गोविंदांच्या साहसाला नागरिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.