गणरायाच्या आगमनाला आता अवघे काही दिवस उरल्याने नाशिकच्या बाजारपेठांमध्ये गणपती मूर्तींच्या खरेदीसाठी भाविकांची लगबग सुरू झाली आहे.
द्वारका परिसरातील बाजारपेठेत विविध आकर्षक गणपती मूर्तींचे स्टॉल सजले आहेत. गणेशभक्तांकडून आपल्या पसंतीच्या मूर्तीची खरेदी केली जात आहे.
सिद्धिविनायक, महादेव प्रतिकृती, नवनाथ गणपती यांसह विविध प्रकारच्या मूर्ती भाविकांच्या पसंतीस उतरू लागल्या आहेत.
मूर्तींच्या विविध आकार आणि प्रकारांमुळे बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या भाविकांची लगबग वाढली आहे.
मात्र, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा गणपती मूर्तींच्या किमतीत सुमारे १० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती मूर्ती विक्रेत्यांनी दिली आहे.
किमती वाढल्याने गणेशभक्तांना यंदा बाप्पांच्या मूर्तीसाठी काहीशी अधिक किंमत मोजावी लागणार आहे.
दरवाढ झाली असली तरी गणरायाच्या स्वागताचा उत्साह कायम असल्याचे चित्र नाशिकच्या बाजारपेठांमध्ये पाहायला मिळत आहे.
गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आला असून, आगामी दिवसांत मूर्ती खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये आणखी गर्दी होण्याची शक्यता आहे.


