नाशिक  : नाशिकच्या पंचवटीतील धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेली सीतागुंफा सुमारे दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा भाविकांसाठी खुली करण्यात आली आहे. कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीअंतर्गत सुरू असलेल्या रामकाल पथाच्या सुशोभीकरणाच्या कामांमुळे काही काळ प्रवेशावर मर्यादा घालण्यात आल्या होत्या. आता दर्शनासाठी मार्ग खुला झाल्याने भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

रामायणाशी निगडित श्रद्धास्थान म्हणून ओळखली जाणारी सीतागुंफा पाहण्यासाठी देशभरातून दररोज हजारो भाविक आणि पर्यटक पंचवटीत येतात. मात्र, परिसरातील विकासकामांमुळे काही दिवस प्रवेश मर्यादित ठेवण्यात आल्याने अनेकांना दर्शन न घेता परत जावे लागत होते.

कामांमध्ये आवश्यक ती प्रगती झाल्यानंतर मंदिर प्रशासनाने पुन्हा भाविकांसाठी सीतागुंफेचे प्रवेशद्वार खुले केले आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच परिसरातील रिक्षाचालक, फुलविक्रेते, प्रसाद विक्रेते आणि अन्य लघु व्यावसायिकांच्या व्यवसायालाही पुन्हा गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

मंदिर प्रशासनाच्या माहितीनुसार, भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आवश्यकतेनुसार प्रवेशाचे नियोजन करण्यात येणार आहे. रामकाल पथाचे सुशोभीकरणाचे काम सुरू असतानाही भाविकांना शक्य तितक्या सुलभ पद्धतीने दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.