गावागावांना जोडणाऱ्या एसटी महामंडळाच्या पार्सल सेवेवर गेल्या तीन महिन्यांपासून ब्रेक लागला आहे. एसटी महामंडळ आणि खासगी कंत्राटदार यांच्यातील करार रद्द झाल्याने पार्सल सेवा ठप्प झाल्याची माहिती आहे. या सेवेवर अवलंबून असलेल्या व्यापारी, छोटे व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

एसटी बसच्या माध्यमातून विविध गावांमध्ये पार्सल पोहोचवण्याची सुविधा अनेकांसाठी सोयीची ठरत होती. विशेषतः ग्रामीण भागातील व्यापारी आणि छोट्या व्यावसायिकांकडून या सेवेचा वापर केला जात होता. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून सेवा बंद असल्याने पार्सल पाठवण्यासाठी नागरिकांना पर्यायी व्यवस्था शोधावी लागत आहे.

एसटी महामंडळ आणि खासगी कंत्राटदारामधील करार रद्द झाल्यानंतर ही सेवा बंद झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पार्सल पाठवण्याच्या खर्चात वाढ होण्यासोबतच वेळेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एसटी ही महत्त्वाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असल्याने पार्सल सेवाही पुन्हा सुरू करण्याची मागणी होत आहे.

व्यापारी आणि छोट्या व्यावसायिकांच्या दैनंदिन व्यवहारांवर या सेवा बंदचा परिणाम होत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाकडून पार्सल सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी काय निर्णय घेतला जातो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

आपलं नाशिक | आपला आवाज