१५ ऑगस्टची सुट्टी आणि त्याला लागून आलेल्या रविवारमुळे नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवर पर्यटक आणि भाविकांची मोठी गर्दी झाली. त्र्यंबकेश्वरकडे दर्शनासाठी तसेच वर्षा पर्यटनासाठी मोठ्या संख्येने नागरिक रवाना झाल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली.
पंढरपूरहून संत निवृत्तिनाथ महाराजांची पालखी त्र्यंबकेश्वरकडे परतली. पालखीच्या स्वागतासाठी आणि पूजनासाठी मार्गातील विविध गावांमध्ये ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीवर अतिरिक्त ताण आला.
त्र्यंबकेश्वर ते महिरावणी परिसरात तब्बल पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक वाहने कोंडीत अडकल्याने वाहनचालकांना मोठ्या मनस्तापाचा सामना करावा लागला.
दरम्यान, सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामामुळेही या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम होत असल्याचं सांगण्यात येत आहे. पिंपळगाव ते सातपूर परिसरापर्यंतही वाहनांची गर्दी झाल्याने वाहतूक नियोजनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सुट्टीच्या दिवशी वाढणारी पर्यटक आणि भाविकांची गर्दी लक्षात घेता प्रशासनाने या मार्गावर प्रभावी वाहतूक नियोजन करावं, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.


