त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वरमध्ये सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगळवारी पहाटेपासून शहरातील अनेक रस्त्यांवर पाण्याचे पाट वाहत होते. त्यातच कुंभमेळ्याच्या विविध विकासकामांसाठी खोदलेले रस्ते आणि डोंगरावरून वाहून आलेल्या मातीमुळे शहरात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास सुरू झालेला मुसळधार पाऊस सलग पाऊण तास कोसळला. त्यामुळे भगवती चौक, लोहार गल्ली, मेनरोड, लक्ष्मी नारायण चौक तसेच गंगा काठ परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. अनेक रस्त्यांवर पाण्याचे प्रवाह वाहत असल्याने नागरिकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागला.
कुंभमेळ्याच्या तयारीसाठी सुरू असलेल्या कामांमुळे अनेक रस्ते खोदण्यात आले आहेत. पावसामुळे डोंगरावरील माती वाहून आल्याने शहरातील अनेक भाग चिखलाने भरले आहेत. सध्या पाऊस थांबून पाणी ओसरले असले तरी नागरिकांना चिखलातून मार्ग काढावा लागत आहे.
दरम्यान, अहिल्या, पुष्करणी आणि गंगासागर परिसरातून आलेले पावसाचे पाणी गोदावरी संगम घाटाकडे वाहताना दिसून आले. हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाची शक्यता व्यक्त केल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
न्यूज डेस्क | आपलं नाशिक


