नाशिक : सिडको परिसरातील उत्तमनगर येथील राजरत्न नगर गार्डनजवळ बुधवारी दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास एका घराला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. विजेच्या मुख्य वायरमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असून, घरातील सर्व इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाले आहे. सुदैवाने घटनेच्या वेळी घर बंद असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, राजरत्न नगर येथील रहिवासी श्री. गुलाब पाटील यांच्या राहत्या घरातील विद्युत मीटरच्या मुख्य वायरमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाले. काही क्षणांतच या आगीने संपूर्ण घरातील वायरिंग आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांना कवेत घेतले. आगीचा भडका उडाल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दुर्घटनेच्या वेळी पाटील दांपत्य कामावर गेले होते, तर मुले शाळेत होती. यामुळे मोठा अनर्थ टळला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेविका योगिता हिरे यांचे प्रतिनिधी तसेच महावितरणचे वायरमन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून परिसरातील विद्युत पुरवठा खंडित केला आणि आगीवर नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेत पाटील यांच्या घराचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
दरम्यान, सिडको आणि परिसरातील अनेक घरांच्या मुख्य विद्युत केबल अत्यंत जुन्या व असुरक्षित झाल्या आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच असे अपघात होत असल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. विद्युत विभागाने संपूर्ण परिसरातील केबल्सची तात्काळ पाहणी करून दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी आता नागरिक करत आहेत.


