आदित्य ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. नाशिक शहरातील रस्ते आणि विकासकामांवरून झालेल्या टीकेला उपमहापौर विलास शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
आदित्य ठाकरे यांना नाशिकमधील विकासकामांची अधुरी आणि चुकीची माहिती मिळाल्याचा दावा विलास शिंदे यांनी केला आहे. शहरात सध्या 32 हजार कोटी रुपयांची विविध विकासकामे सुरू असून, प्रशासन नागरिकांच्या सुविधांसाठी 24 तास कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं.
आदित्य ठाकरे यांनी नाशिक दौऱ्यात रस्त्यांची पाहणी करत प्रशासनावर टीका केली होती. यावर बोलताना विलास शिंदे यांनी फक्त एका तासात दौरा पूर्ण करून शहराची संपूर्ण परिस्थिती समजू शकत नाही, असा टोला लगावला.
ठाकरेंनी प्रत्यक्ष प्रशासन आणि लोकप्रतिनिधींशी चर्चा करून माहिती घेतली असती तर अधिक योग्य चित्र समोर आलं असतं, असंही शिंदे म्हणाले.
दरम्यान, पुढील सहा महिन्यांत नाशिक शहरात मोठा बदल पाहायला मिळेल, असा दावा उपमहापौरांनी केला आहे. तसेच 15 ऑगस्टपूर्वी शहरातील खड्डे बुजवण्याचं काम सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
नाशिकच्या विकासकामांवरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.


