सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धोम धरणातील पाणीसाठा ८९ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून विसर्ग वाढवण्यात आला असून, कृष्णा नदीच्या पाण्याने वाई येथील श्री महागणपती मंदिराच्या चरणांना स्पर्श केला आहे.

धरणातून ४ हजार ९६६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या विसर्गामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून श्री महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा पडला. पारंपरिक मान्यतेनुसार कृष्णा नदीच्या पाण्याने महागणपतींच्या चरणांना स्पर्श झाल्यानंतर मंदिरात जलाभिषेक आणि महापूजा करण्यात आली.

वाढत्या पाणीपातळीच्या पार्श्वभूमीवर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांनी मंदिराबाहेरूनच श्रींचे दर्शन घ्यावे, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे.

दरम्यान, प्रशासनाने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. कृष्णा नदीच्या पाणीपातळीवर प्रशासन सातत्याने लक्ष ठेवून आहे.