छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील जायकवाडी धरणातून आज (६ ऑगस्ट) सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान १० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. धरण परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे जलाशयातील पाण्याची आवक वाढल्याने नियोजनाचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

जायकवाडी पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, धरणाच्या सांडव्याद्वारे पाण्याचा विसर्ग केला जाणार असून जलाशयात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणानुसार विसर्गात वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.

प्रशासनाने गोदावरी नदीकाठच्या सर्व गावांतील नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नदीपात्रात उतरू नये, मासेमारी, कपडे धुणे, जनावरे पाण्यात नेणे किंवा इतर कोणत्याही कारणासाठी नदीत जाणे टाळावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

तसेच सखल भागातील नागरिकांनी अधिक खबरदारी घ्यावी आणि स्थानिक प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पाण्याचा विसर्ग सुरू असताना नदीपात्र आणि नदीकाठच्या परिसरात अनावश्यक वावर टाळण्याचा सल्लाही प्रशासनाने दिला आहे.