दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड धरण सहा दिवसांच्या संततधार पावसानंतर अखेर शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झाले आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने दिंडोरी आणि कसबे वणी परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता दूर झाली असून सिंचनासाठीही मोठा दिलासा मिळाला आहे.

धरण भरल्यानंतर ओझरखेड धरणाच्या सांडव्यावरून उणंदा नदीत १६०२ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नदीतील पाणीपातळी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

या धरणामुळे दिंडोरी आणि कसबे वणी परिसरातील सुमारे ५० हजार नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. तसेच १४ हजार ८५७ हेक्टर क्षेत्रातील शेतीसाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे.

याशिवाय लखमापूर औद्योगिक वसाहतीसाठीही अखंडित पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा झाला आहे. धरण भरल्यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून परिसरात आनंद व्यक्त केला जात आहे.