सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर परिसरात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्र्यंबकेश्वरचा दौरा केला. बसमधून प्रवास करत त्यांनी मार्गातील आणि परिसरातील सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. सिंहस्थाच्या तयारीसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा, विकासकामांची प्रगती आणि नियोजन याबाबत प्रशासनाकडून माहिती घेण्यात आली.
या दौऱ्यापूर्वी सिन्नर औद्योगिक क्षेत्रात ‘मिशन ग्रीन मान्सून’च्या नवव्या टप्प्याअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झालेल्या या वृक्षारोपण मोहिमेत उद्योगविकासासोबत पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देण्याचा संदेश देण्यात आला. औद्योगिक क्षेत्राचा विकास करताना पर्यावरणाचा समतोल राखणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
यानंतर महाजन त्र्यंबकेश्वरकडे रवाना झाले. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विविध विकासकामांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. कामांची सद्यस्थिती, प्रगती आणि पुढील नियोजनाचा आढावा घेण्यात आला.
त्र्यंबकेश्वरमध्येही ‘मिशन ग्रीन मान्सून’अंतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी आणि पर्यावरण संवर्धन या दोन्ही उपक्रमांना एकाचवेळी गती देण्याचा प्रयत्न या दौऱ्यातून होत आहे.


