नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभमेळ्याचा प्रारंभ येत्या एकतीस ऑक्टोबरला ध्वजारोहणाने होणार आहे. या पार्श्वभूमीवर गोदावरीच्या तीरावर धार्मिक परंपरेला आधुनिक स्थापत्याची जोड देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नाशिकच्या रामतीर्थावर एकावन्न फुटांचा, तर त्र्यंबकेश्वर आणि नवीन गोदावरी घाट परिसरात एकतीस फुटांचे ध्वजस्तंभ उभारण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. त्यामुळे सिंहस्थाच्या ध्वजपरंपरेला यंदा विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे.

प्रस्तावित आराखड्यानुसार, ध्वजस्तंभांवर समुद्रमंथनाशी संबंधित पौराणिक प्रसंगांचे प्रतीकात्मक कोरीवकाम करण्याची संकल्पना आहे. सिंह, चंद्र, सूर्य, अमृतकुंभ, ओम, स्वस्तिक आणि श्री ही धार्मिक प्रतीके ध्वजाच्या परंपरेशी जोडली जाणार आहेत. मात्र, ध्वजस्तंभाची वास्तुरचना, त्यावरील शिल्पे आणि प्रत्यक्ष फडकवली जाणारी धर्मपताका या स्वतंत्र बाबी आहेत. धर्मपताकांची रचना संबंधित पुरोहित संघांकडून निश्चित केली जाणार आहे.

नाशिकच्या रामतीर्थावर आणि त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त तीर्थावर एकतीस ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी ध्वजारोहण होणार आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठिकाणच्या ध्वजस्तंभांच्या रचनेत सुसंगती ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

ध्वजस्तंभांचा पाया मजबूत आणि टिकाऊ ठेवण्यावर भर देण्यात आला असून, सजावटीचे आणि प्रतीकात्मक कोरीवकाम वरच्या भागात करण्याची संकल्पना आहे. धार्मिक श्रद्धा, समुद्रमंथनाचा पौराणिक वारसा आणि आधुनिक स्थापत्य यांचा संगम या ध्वजस्तंभांच्या माध्यमातून साधण्याचे नियोजन आहे. त्यामुळे सिंहस्थाच्या प्रारंभाचा ध्वजारोहण सोहळा विशेष आकर्षण ठरणार आहे.