त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुरू असलेल्या वीज उपकेंद्राच्या कामावर पडलेल्या भीषण दरोड्याचा नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवघ्या दोन तासांत छडा लावला आहे. या कारवाईत १२ पैकी ११ आरोपींना अटक करण्यात आली असून अपहरण करण्यात आलेल्या दोन कामगारांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी तलवार आणि पिस्तुलाचा धाक दाखवत कामगारांना धमकावले. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी साहित्य, मोबाईल आणि ट्रॅक्टर लुटून दोन कामगारांचे अपहरण केले होते.
घटनेची माहिती मिळताच नाशिक ग्रामीण पोलिसांनी तातडीने नाकाबंदी करून शोधमोहीम सुरू केली. अवघ्या दोन तासांत पोलिसांनी ११ आरोपींना ताब्यात घेतले. तसेच चोरी गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अपहृत कामगारांची सुरक्षित सुटका करण्यात आली.
या प्रकरणात आरोपींनी पूर्वनियोजित रेकी करून गुन्हा केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या गुन्ह्यातील एका फरार आरोपीचा शोध सुरू असून प्रकरणाचा पुढील तपास नाशिक ग्रामीण पोलीस करत आहेत.


