नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील घोटी बुद्रुक येथील दुर्गानगरमध्ये रस्त्याच्या दुरवस्थेमुळे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्ता खोदून ठेवल्याने रुग्णवाहिकेला गावापर्यंत पोहोचता आले नाही. त्यामुळे आजारी असलेल्या आदिवासी वृद्ध महिलेला ग्रामस्थांनी झोळीतून खांद्यावर उचलून चिखलातून रुग्णवाहिकेपर्यंत नेले.

या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याची अवस्था अत्यंत खराब असून पावसामुळे चिखल आणि खड्ड्यांमुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. या रस्त्यावरून दैनंदिन प्रवास करणेही नागरिकांसाठी कठीण झाले आहे.

ग्रामस्थांनी आरोप केला आहे की, या रस्त्यामुळे परिसरातील सुमारे ५० ते ६० कुटुंबांचा संपर्क तुटला आहे. रस्ता तातडीने सुरू करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष न दिल्यास ९ ऑगस्ट रोजी आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.