खंडेराव नगरात घरांमध्ये पाणी; निचरा ठप्प झाल्याने नागरिकांचा संताप

नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील खंडेराव नगरात मुसळधार पावसामुळे गंभीर पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली आहे. हॉटेल रेडिसन ब्ल्यूसमोरील परिसरात पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे फर्निचर, इलेक्ट्रॉनिक साहित्य तसेच इतर संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. प्रत्येक पावसाळ्यात हीच समस्या उद्भवत असतानाही महापालिका प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना केल्या नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

 

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी सक्षम जलनिस्सारण व्यवस्था नसल्याने संपूर्ण परिसर जलमय होत आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही अवघड झाले असून दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे.

याप्रकरणी तातडीने नालेसफाई, जलनिस्सारण व्यवस्था सुधारणा आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.