दूधाच्या दरात झालेल्या वाढीला ग्राहकांकडून हिरवा कंदील मिळत असून, त्याबदल्यात दर्जेदार दूध मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादनाचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

सध्या म्हशीच्या दुधाचा दर ९० रुपये, तर गाईच्या दुधाचा दर ५५ रुपये प्रति लिटर इतका आहे. दूध उत्पादनासाठी लागणारा चारा, ढेप, सरकी तसेच गुळाच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे.

दुभत्या जनावरांचे संगोपन, चारा आणि पशुखाद्याचा खर्च यामुळे दूध उत्पादनाचा आर्थिक भार शेतकऱ्यांवर वाढत आहे. या वाढत्या खर्चाचा विचार करून दूध उत्पादकांना योग्य दर मिळणे गरजेचे असल्याचे सांगितले जात आहे.

दरवाढीमुळे ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडत असला, तरी दुधाचा दर्जा चांगला राहावा आणि भेसळ कमी व्हावी, अशी ग्राहकांची अपेक्षा आहे. योग्य दर दिल्यास दूध उत्पादकांकडून दर्जेदार दूध उपलब्ध होण्यास मदत होईल, अशी भावना व्यक्त होत आहे.

त्यामुळे दूध दरवाढीचा फायदा केवळ उत्पादकांनाच नव्हे, तर ग्राहकांना चांगल्या गुणवत्तेच्या दुधाच्या रूपात मिळावा, अशी अपेक्षा आहे. दूधाचे दर, उत्पादन खर्च आणि दुधाचा दर्जा यामध्ये योग्य समतोल साधण्याचे आव्हान आता महत्त्वाचे ठरणार आहे.