द्वारका सर्कलच्या भुयारी मार्गाच्या कामामुळे मुंबईनाका आणि वडाळा परिसरातील वाहतुकीवर मोठा ताण निर्माण झाला आहे. दररोज होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी विशेष नियोजन केले असून, मुंबईनाक्यावर स्वतंत्र वाहतूक युनिट कार्यरत करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने १५ ऑगस्टपासून या स्वतंत्र वाहतूक युनिटच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. या युनिटची जबाबदारी पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यांच्या मदतीला दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक, दोन उपनिरीक्षक आणि तब्बल ६५ पोलीस अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हे पथक दररोज दोन शिफ्टमध्ये मुंबईनाका परिसरातील वाहतूक नियंत्रणाचे काम करणार आहे. द्वारका सर्कलच्या सुरू असलेल्या कामामुळे मुंबईनाका मार्गावर वाहतुकीचा मोठा भार आला असून, त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. परिणामी वाहनचालकांना दररोज मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
मुंबईनाक्यावर स्वतंत्र वाहतूक यंत्रणा तैनात केल्यामुळे वाहतुकीचे नियमन अधिक प्रभावीपणे करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. विशेषतः मुंबईनाका आणि वडाळा परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यावर या पथकाचा भर राहणार आहे. पोलिसांच्या या नव्या नियोजनामुळे मुंबईनाक्यावरील वाहतूक कोंडी कितपत कमी होते आणि वाहनधारकांना किती दिलासा मिळतो, याकडे आता नाशिककरांचे लक्ष लागले आहे.


