नाशिकमधील सातपूर–अंबड लिंक रोडची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत असून, या मार्गावरील मोठमोठे खड्डे, चिखल आणि पावसामुळे साचलेल्या पाण्यामुळे हजारो कामगार, वाहनचालक आणि नागरिकांना दररोज मोठा त्रास सहन करावा लागत आहे. उद्योगनगरीला जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता सध्या धोकादायक बनल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने रस्त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे विशेषतः दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात औद्योगिक वाहतूक आणि कामगारांची ये-जा होत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनत आहे.

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनांचे नुकसान, वाहतुकीचा वेग मंदावणे आणि प्रवासासाठी अधिक वेळ लागणे अशा समस्यांनाही नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी केवळ तात्पुरती डागडुजी न करता दर्जेदार आणि कायमस्वरूपी रस्ते दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.