नाशिकच्या मुंबई–आग्रा महामार्गावरील भुजबळ फार्म परिसरात अपघातांची मालिका सुरूच असून, अवघ्या दोन दिवसांत तिसरा अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आज सकाळी मुंबईहून धुळ्याकडे जाणाऱ्या ट्रक, पिकअप आणि एका चारचाकी वाहनामध्ये अपघात झाला. या अपघातात चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. तसेच ट्रक चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, भुजबळ फार्म परिसरात वारंवार अपघात घडत असल्याने या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.