सप्तशृंगी गड : श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर यात्रेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेसाठी उभारण्यात आलेल्या बॅरिकेटिंगमुळे स्थानिक व्यापारी आणि भाविकांना भेडसावणाऱ्या अडचणींवर अखेर प्रशासनाने सकारात्मक तोडगा काढला आहे. बॅरिकेटिंगचा काही भाग बाजूला करून मार्ग मोकळा करण्यात आल्याने व्यापारी, भाविक तसेच वृद्ध नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यात्रेनिमित्त प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कडक बॅरिकेटिंगमुळे गडावरील स्थानिक दुकानदारांच्या व्यवसायावर गंभीर परिणाम होत होता. त्यातच बसस्थानक गावाबाहेर सुमारे एक किलोमीटर अंतरावर असल्याने भाविकांना गडावर पोहोचण्यासाठी मोठा लांबचा वळसा घालावा लागत होता. परिणामी, लहान मुले, वृद्ध नागरिक आणि भाविकांची मोठी दमछाक होत होती. इतकेच नव्हे तर, आपत्कालीन स्थितीत रुग्णवाहिकेला वळण घेण्यासाठीही पुरेशी जागा शिल्लक राहत नव्हती.

या समस्येबाबत गडावरील व्यापाऱ्यांनी एकत्र येत प्रशासनाकडे धाव घेतली व मार्ग मोकळा करण्याची आग्रही मागणी केली. व्यापाऱ्यांच्या या रास्त मागणीची तत्काळ दखल घेत तहसीलदार वारुळे आणि पोलीस उपनिरीक्षक ठोंबरे यांनी प्रत्यक्ष मध्यस्थी करून सुवर्णमध्य साधला. प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेत योग्य बदल करत बॅरिकेटिंग बाजूला केले. या निर्णयामुळे व्यापाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न सुटण्यासोबतच भाविकांनाही सुलभ आवागमन करता येणार आहे. आगामी काळात सुरक्षेसोबतच स्थानिक रोजगार आणि नागरी सुविधांचा समतोल राखला जावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.