नाशिक : शिक्षणाचे वाढते बाजारीकरण, NEET परीक्षेतील वाद, विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटना आणि शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये CJP आणि विविध पुरोगामी संघटनांच्या वतीने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
शालिमार येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी मोर्चेकऱ्यांनी शिक्षणाच्या खासगीकरणाविरोधात घोषणाबाजी करत शिक्षण सर्वसामान्यांसाठी परवडणारे आणि सुलभ करण्याची मागणी केली. तसेच NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि विद्यार्थ्यांवरील वाढत्या मानसिक तणावाच्या घटनांबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली.
मोर्चादरम्यान दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणारे पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या घटनेचाही निषेध करण्यात आला. 'एक देश, एक परीक्षा' या धोरणाऐवजी राज्यस्तरीय CET किंवा बारावीच्या गुणांच्या आधारे प्रवेश प्रक्रिया राबविण्याची मागणी आंदोलकांनी केली.
तसेच शिक्षण क्षेत्रासाठी सार्वजनिक खर्चात वाढ करावी, विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि समान शिक्षण उपलब्ध करून द्यावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन मोर्चानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आले.


