परिस्थिती कितीही कठीण असली, तरी जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर ध्येय गाठता येतं, हे नाशिकच्या स्नेहा बळीराम कोळे यांनी दाखवून दिलं आहे.
जेलरोड परिसरातील आम्रपाली झोपडपट्टीतून आलेल्या स्नेहाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर पदाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
स्नेहाचे वडील हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आर्थिक अडचणी असतानाही आणि कुटुंबात शिक्षणाची मोठी पार्श्वभूमी नसतानाही स्नेहाने शिक्षणाची वाट सोडली नाही.
स्नेहाने संदीप फाऊंडेशनमधून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांपासून प्रेरणा घेत स्नेहाने सातत्याने अभ्यास करत स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आपले ध्येय गाठले.
विशेष म्हणजे, स्नेहाने आतापर्यंत तीन ते चार स्पर्धा परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केल्याची माहिती आहे.
आर्थिक परिस्थिती, मर्यादित साधनसामग्री आणि अनेक अडचणी असूनही तिने आपल्या मेहनतीच्या जोरावर सरकारी सेवेत स्थान मिळवले आहे.
झोपडपट्टीतील प्रतिकूल परिस्थितीतून सुरू झालेला इन्कम टॅक्स इन्स्पेक्टरपर्यंतचा स्नेहाचा प्रवास आज अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
परिस्थितीवर मात करून शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यश मिळवण्याची जिद्द असलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्नेहाची कहाणी निश्चितच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरणारी आहे.


