सुरगाणा : सुरगाणा तालुक्यातील आदिवासी भागात धावणाऱ्या बर्डीपाडा–रगतविहिर मार्गावरील एसटी बसच्या वारंवार होणाऱ्या बिघाडामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. रस्त्यातच बस बंद पडणे, ब्रेक निकामी होणे आणि नवीन बसेस ग्रामीण मार्गांवर न धावविण्यात येत असल्याचा आरोप करत प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
बर्डीपाडा–रगतविहिर मार्गावरील एसटी बस वारंवार नादुरुस्त होत असल्याने विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदार वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रवासादरम्यान बस कधी बंद पडेल याची शाश्वती नसल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, रगतविहिरहून परतणाऱ्या बसचे ब्रेक निकामी झाल्याने ती वणी बसस्थानकात थांबवावी लागली. या घटनेमुळे विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले. कळवणहून येणाऱ्या बसेस आधीच प्रवाशांनी खचाखच भरलेल्या असल्याने अनेकांना तासन्तास बसस्थानकात प्रतीक्षा करावी लागली.
अखेर काही प्रवाशांना कळवणमार्गे नाशिककडे रवाना करण्यात आले. ग्रामीण भागासाठी दाखल झालेल्या 'आईसाहेब राज जिजाऊ' नवीन बसेस ग्रामीण मार्गांवर न चालवता इतर मार्गांवर धावत असल्याचाही आरोप नागरिकांनी केला आहे.
कळवण डेपोमध्ये कायमस्वरूपी जबाबदार अधिकारी नेमून बर्डीपाडा–रगतविहिर मार्गावर सुस्थितीतील बसेस उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा प्रवाशांनी दिला आहे.


