नाशिक : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंचक गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून पंचक तसेच पंचक्रोशीतील वारकरी भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पायी दिंडीने पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत.
पंचक चौफुली येथे श्रीफळ वाढवून दिंडी सोहळ्याची उत्साहात सुरुवात करण्यात आली. टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि "ज्ञानबा-तुकाराम", "विठ्ठल विठ्ठल" च्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.
रेणुका माता प्रतिष्ठान नागापूर-बोल्हेगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या पायी दिंडी सोहळ्यात सुमारे तीस ते पस्तीस वारकरी भाविक सहभागी झाले आहेत. हरिभक्त परायण तुकाराम महाराज कातोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहे.
ही दिंडी कोल्हापूर, देहू, आळंदी, गाणगापूर आणि अक्कलकोट या धार्मिक स्थळांना भेट देत अखेर पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पोहोचणार आहे.
आषाढी वारीच्या निमित्ताने पंचक परिसरात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विठुरायाच्या भेटीसाठी वारकरी भाविकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे.


