नाशिक : त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘कुंभ भक्ती संगम’ या तीन दिवसीय भव्य भक्ती महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. २८ ते ३० ऑगस्टदरम्यान ठक्कर डोम येथे भक्ती, संगीत आणि विविध भारतीय सांस्कृतिक परंपरांचा अनोखा संगम नाशिककर आणि भाविकांना अनुभवता येणार आहे. विशेष म्हणजे या महोत्सवासाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य असणार आहे.

या महोत्सवाची सुरुवात २८ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटनाने होणार आहे. पहिल्या दिवशी अमृताश्रम स्वामी महाराज यांचे कीर्तन आणि प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांची ‘अभंगवारी’ सादर होणार आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी भक्ती आणि संगीताची विशेष मेजवानी नाशिककरांना मिळणार आहे.

२९ ऑगस्ट रोजी संतपरंपरेच्या सहभागावर आधारित भक्ती संमेलनाच्या दोन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर डॉ. चारुदत्त आफळे यांचे कीर्तन आणि लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर यांच्या भजनाचा कार्यक्रम होणार आहे. विविध संतपरंपरा आणि भक्तिसंगीताच्या माध्यमातून या दिवशी भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.

महोत्सवाच्या अंतिम दिवशी म्हणजेच ३० ऑगस्ट रोजी देशातील विविध भागांतील भक्ती आणि सांस्कृतिक परंपरांचा अनुभव घेता येणार आहे. अमृतसर येथील श्री दरबार साहिबचे भाई मनिंदर सिंह हजुरी रागी यांचे गुरबाणी शबद कीर्तन, मणिपूरचे नट संकीर्तन आणि निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन असे विविध कार्यक्रम होणार आहेत.

या तीन दिवसीय महोत्सवाच्या माध्यमातून देशाच्या विविध भागांतील भक्तीपरंपरा, संगीत, कीर्तन आणि सांस्कृतिक वारसा एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे नाशिककरांसह बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठीही हा महोत्सव विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी नाशिककर, भाविक, विद्यार्थी तसेच सांस्कृतिक रसिकांनी या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून वाहतूक आणि पार्किंगचे नियोजन करण्यात आले आहे.