सिंहस्थ महाकुंभ 2027च्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये देशभरातील विविध भक्तिपरंपरांचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने 28 ते 30 ऑगस्टदरम्यान ठक्कर डोम येथे ‘सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम’ या तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्र, पंजाब, मणिपूर यांसह देशातील विविध भागांतील भक्ती, संगीत आणि संतपरंपरा एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
महाराष्ट्राची पारंपरिक कीर्तन आणि अभंगवारी, पंजाबची गुरबाणी शबद कीर्तन आणि मणिपूरची वैशिष्ट्यपूर्ण नट संकीर्तन परंपरा या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. भाषा, संगीतशैली आणि सादरीकरणाच्या पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी भक्तीचा समान धागा या सर्व परंपरांना जोडतो. याच भावनेतून देशातील विविध भक्तिपरंपरांमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण घडवून आणण्याचा उद्देश या महोत्सवामागे आहे.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी प. पू. अमृताश्रम स्वामी महाराज यांच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सुरुवात होणार असून, त्यानंतर श्री. राहुल देशपांडे यांच्या अभंगवारीचे सादरीकरण होणार आहे. दुसऱ्या दिवशी ह.भ.प. डॉ. चारुदत्त गोविंदस्वामी आफळे यांच्या कीर्तनासोबत कु. मैथिली ठाकूर यांच्या भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी पंजाबच्या भक्तिपरंपरेचे दर्शन घडणार आहे. भाई मनिंदर सिंहजी हजुरी रागी – श्री दरबार साहिब, अमृतसर यांच्या माध्यमातून गुरबाणी शबद कीर्तनाचे सादरीकरण होणार आहे. त्यानंतर मणिपूरच्या पारंपरिक नट संकीर्तन महाजेग्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे तीन दिवसांत देशातील विविध प्रांतांच्या भक्ती आणि संतपरंपरांचा अनुभव नाशिककरांसह भाविक आणि रसिकांना घेता येणार आहे.
या महोत्सवात भक्तिसंगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच 29 ऑगस्ट रोजी ‘भक्ती संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात भारतीय संतपरंपरा, सामाजिक समरसता, महासिंहस्थ कुंभमेळा आणि राष्ट्रीय दृष्टिकोनातून संतपरंपरेचा सहभाग व समन्वय या विषयांवर विचारमंथन होणार आहे. त्यामुळे हा महोत्सव केवळ मनोरंजन किंवा सांस्कृतिक कार्यक्रमापुरता मर्यादित न राहता भारतीय आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाच्या संवादाचे व्यासपीठ ठरणार आहे.
सिंहस्थ महाकुंभ 2027च्या तयारीच्या दृष्टीने नाशिकमध्ये विविध पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. रस्ते, वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि भाविकांची सुरक्षा यांसोबतच नाशिकची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळख देशभर पोहोचवण्यावरही भर दिला जात आहे. ‘सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम’ हा त्याच व्यापक तयारीचा आणि सांस्कृतिक दृष्टिकोनाचा महत्त्वाचा भाग मानला जात आहे.
कुंभमेळ्याची मूळ भावना ही विविधतेतून एकात्मतेचा संदेश देणारी आहे. देशाच्या विविध भागांतून येणाऱ्या भाविकांना आणि संतपरंपरांना नाशिकच्या भूमीवर एकत्र आणत या भावनेला सांस्कृतिक स्वरूप देण्याचा प्रयत्न या महोत्सवातून केला जाणार आहे. त्यामुळे 28 ते 30 ऑगस्टदरम्यान ठक्कर डोम येथे होणारा ‘सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम’ हा महाराष्ट्रापासून पंजाब आणि मणिपूरपर्यंतच्या भक्तिपरंपरांचा अनोखा Cultural Kumbh ठरण्याची अपेक्षा आहे.


