नाशिक : ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी बुधवारी (दि. १४) रामकुंड आणि गोदाघाट परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान कामांमधील धिम्या गतीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे कडक निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

कुंभमेळ्याच्या तयारीच्या दृष्टीने घाटांची दुरुस्ती, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि सुरक्षिततेशी संबंधित सर्व उपाययोजना वेळेत पूर्ण करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. मनपाच्या मनाई आदेशानंतरही बुधवारी गोदाघाट परिसरात आठवडे बाजार भरल्याचे निदर्शनास येताच अतिक्रमण विभागाने धडक कारवाई सुरु केली. यशवंत महाराज पटांगण ते रामसेतू पुलादरम्यानच्या १२ टपऱ्या हटवण्यात आल्या, तर गणेशवाडी फूल मार्केटमधील तब्बल १५० फुलविक्रेत्यांना दोन दिवसांत जागा रिकामी करण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे.

ध्वजारोहण सोहळ्यासाठी गोदाघाट लकाकण्यासाठी सायंकाळी उशिरापर्यंत यांत्रिक झाडूच्या साहाय्याने परिसराची सफाई सुरू होती. या पाहणीदरम्यान शहर अभियंता संजय अग्रवाल, घनकचरा विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड, कार्यकारी अभियंता प्रशांत पगार आणि विद्युत विभागाचे अभियंता अनिल गायकवाड यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.